Tuesday, June 7, 2016

थेंबभर गोष्ट

एकचं थेंब, अगदी एकलकोंडा, सरसरत्या पानाच्या टोकावर हळूच डोकावून बघत होता. काहीसा घाबरलेला खरा पण प्रचंड उत्सुकतेनी ओतप्रोत भरलेला! कस असेल बाकीचं उरलेलं जग? उडी मारलीच तर तो शेवट असेल कि नवी सुरवात?

शेवट म्हणायला आधी सुरवात तर ठाऊक हवी. होती तरी कशी सुरवात? काही ठिकस आठवत नाही. कधीतरी खोलवर समुद्रात अगदी तळाला, कधी अगदी उंच उंच आकाशात वर ढगांच्या उबदार कुशीत, कधी वाऱ्याबरोबर मस्त उडताना आणि कधी मातीच्या आत आत जातांना असं बरच सार स्मरत होत.

विचारांच्या नादात स्वतःच्याच घसरड्या पायांनी तो अजून खाली कधी घसरला त्याच त्यालाच कळलं नाही. आता खाली पडायचाच पण इतक्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि पानचं जरासं तिरक झालं. कसबस  सावरून स्वारी परत विचारात बुडाली.

आता बराच वेळ झाला होता. कदाचित थोड्यावेळाने अजूनही थोडे थेंब येतील अशी वेडी आशा ही कुठेतरी होतीच. सहज म्हणून त्यानी मागे वळून पाहिलं. दूर आकाशात ढग साचत होते. वीजही अधूनमधून चमकत होती. आणि तो ज्या वादळातून आला होता, त्यातच उन्मळून पडलेले झाड, ज्याच्या पानावर तो बसून होता, ते आता नदी ओलांडून समुद्राच्या दिशेने पोहत निघाले होते...

Sunday, March 13, 2016

शब्द

घंटा नाद प्रथम प्रहारीचा 
कसा घुमावा शब्दातून 
दव बिंदूंची अवखळ लगबग 
कशी तोलावी शब्दातून

उत्कटता त्या नजरेमधली 
उलगडेल का शब्दामधुनी
ओली खोली रत्नाकराची 
कशी मापावी शब्दामधुनी

अंतरातली असीम इच्छा
परोपकारातली सदिच्छा 
अव्यक्त अशा साऱ्या इच्छा
वदतील का रे शब्द होवून 

हे ही वदतील, तो कवी म्हणतो 
'त्याचे'च सारे 'तो'च वदवितो 
जो जो 'त्या'शी समरूप होतो
शब्दही त्याच्या शरणी येतो...

- देवेंद्र ओंक.