Tuesday, November 27, 2018

बदल

नमस्कार! हा माझाच २०१४ साली लिहिलेला एक छोटेखानी लेख. अर्थातच भारतात लिहिलेला, पण त्यातले संदर्भ आणि अनुभव आपल्या दिवाळी अंकाच्या वाचकांना अनोळखी वाटतील अस वाटत नाही, म्हणून तसाच थोडीफार काटछाट करून पुन्हा लिहितोय. सॉरी सॉरी, 'रिप्रोड्युस' करतोय...

२६ हे काही 'आमच्या वेळेला हे असं नव्हतं' असं म्हणण्याचं वय नव्हे. पण हल्ली, अगदी पुण्याचा  नसूनही,असं अगदी पावलोपावली म्हणावसं वाटतं. आता आधी ही आमची वेळ नक्की कोणती हे स्पष्ट केलं पाहिजे नाही का? तर ती म्हणजे २००० सालाच्या आसपासची. Y2K की काय तो फुगा फुटण्याच्या  आधी नंतरची. त्यानी संगणकांना काही फारसा अपाय केला नाही म्हणतात पण आता जरासं मागे डोकावून पाहिलं की जाणवतं, अनेक उत्तम शोधांबरोबरच या तांत्रिक क्रांतीने काही  साध्या,सरळ, निर्भेळ आनंदातली हवा नक्कीच काढली. उत्क्रांती ही कायम चालूच असते पण गेल्या दशकात अनेक क्रांतीमय बदल झाले, त्याचा आणि त्यानी निर्माण केलेल्या नवीन प्रतलांचा हा भूतकाळाशी मेळ घालत केलेला एक धावता आढावाच म्हणा ना. चुका करण्याप्रमाणेच, बदलाशी सामावून घेणे हा माणसाचा स्थायीभाव आहे. परंतु हा गुणधर्म, आनंद आणि स्थैर्यापेक्षा जिवंत राहण्याच्या गरजेशी जास्त निगडित. सर्वात नियमितपणे होणारी गोष्ट म्हणजे बदल असेही म्हणतात. एकूण बदल हे होणारच आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यातच शहाणपण. ते करतानाचा हा जमाखर्च.

आठवणीत मागे मागे जातांना ठरवलेला पिव्होट पॉईंट म्हणजे शाळा. मला आठवतंय शाळा सुरु होण्याच्या काही दिवस आधी नवीन पुस्तकं मिळायची. मग पटापट ती चाळून आवडीनिवडीचे धडे कविता ठरवले जायचे. पुस्तकांचा नवीन ताजा वास आणि त्याला आजोबांनी घालून दिलेली खाकी कव्हर्स. हल्ली बुक च्या जमान्यात उपलब्धता सुकर झाल्येय पण ती झाल्येय पार अन-सेन्टेड! पावसाचे दिवस असल्याने मग सायकल च्या रिम्स ना सोनेरी रंग दिला जायचा. माझयावेळीही स्कुल बस ची भानगड होती पण मी आमच्या गावातल्याच शाळेत असल्याने, सुरवातीला आजोबा आणि मी जरा ' मोठा' झाल्यावर मिळालेली सायकल हेच सोबती असायचे. शाळा सुरु व्हायची आणि त्याच सुमारास रस्त्यातल्या शेतात लगबग ही वाढायची. रस्त्यात आम्हा मुलांबरोबर बैल ही चालायचे. आमच्या पाठीवर पुस्तकांचं ओझं आणि त्यांच्यावर नांगराचं. हळूहळू पाऊस जोर धरू लागे आणि एकदाचा तो सुवर्ण दिवस उगवायचा. नदीचं पाणी फारचं वाढल्यानं शाळेला सुट्टी! तेव्हा पुराची ब्रेकिंग न्यूज वगैरे व्हायची नाही आणि झाली तरी बघणार कोण हो? अख्ख गाव पुराची गम्मत बघायला नदीवर लोटलेल असायचं. मग लवकरच यायचे श्रावणी सोमवार. ते आठवतात कारण तेव्हा शाळा लवकर सुटायची आणि आम्ही तो वेळ अर्थातच यथेच्छ खेळण्यात घालवायचो. मग यायची दहीहंडी. घरोघरी जाऊन दही दूध गोळा करायचं, हंडी बांधून त्या खाली फेर धरून नाचायचं, हंडी फुटली कि पुन्हा घरोघरी जायचं, गरम पाण्यात न्हाऊन निघायचं आणि आम्हा बालगोपाळांसाठी बनवलेला लोणी साखरेचा नैवेद्य आणि दहीपोहे खायचे. तेव्हा दहीहंडी हवीहवीशी वाटायची पण हल्ली डी जे चा कानठळ्या बसवणारा आवाज आणि गर्दी यामुळे दहीहंडीला सुट्टी नसलेलीच बरं असं वाटतं. त्यानंतर अर्थातच गणपतीची गडबड आणि धमाल. आमच्या आळीतले गणपती आम्हीच तळ्यात उतरून विसर्जन करायचो. आता सुशोभिकारणाच्या नावाखाली त्या तळ्याचं एवढं विद्रुपीकरण झालयं कि त्यात मनुष्यप्राण्यालातरी उतरण आता शक्य नाही.

मग अचानक एक सकाळ उगवायची ती धुक्याचं पांघरूण घेऊन. सकाळी सकाळी धुक्यातून सायकल हाकत जायला मोठी मौज यायची. तेव्हा खरंच कडाक्याची थंडीहि पडायची. अगदी तीन तीन पांघरूणं घेऊनही आवरणारी. हल्ली सिमेंटच्या जंजाळात ती थंडी आणि पांघरुणातली हविहवीशी वाटणारी उब दोन्ही गेलं. याच आसपास सहामाही परीक्षा आणि त्या होण्याच्या आधीपासूनच किल्ल्यांचं प्लांनिंग सुरु व्हायचं. मातीत लोळतांना तेव्हा आमच्या पालकांना कधी अनहायजिनिक वाटलं नाही आणि आम्हालाही कधी कुठले रोग झाले नाहीत. हल्ली 'पीओपी' चे रेडिमेड किल्ले मिळतात म्हणे. ते घेणाऱ्या मुलांची मला खरंच किंव येते. दिवसभर माती खणायची, दगड गोळा करायचे, नळीची कौलं आणून बुरुजाची आणि सलाईन नि कारंज्याची सोय करायची. एकमेकांचे किल्ले एकत्र बनवले जायचे आणि सगळं माती लिंपून तय्यार झालं, कि शेतात अळिवाची पेरणी व्हायची. रोज शेत किती वाढलं हे बघायचं. हल्ली यालाच ऑप्टीमम यूटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस आणि टीमवर्क इत्यादी म्हणतात म्हणे आणि ते शिकायला लोक चक्क पैसे हि देतात! सुट्टीत सकाळी फराळ करून बाहेर पडलं कि अख्खा दिवस किल्ले, खेळ यातच जायचा आणि आमच्या या बिझी शेड्युल मध्ये छंदवर्ग वगैरे साठी स्लॉटच नसायचा. असे सारे ऋतू आम्हाला पाठ करताही लक्षात राहायचे. आणि गम्मत म्हणजे वेधशाळेच्या अंदाजाची वाट बघताच उन्हं वाढली कि उन्हाळा, पावसाबरोबर पावसाळा आणि थंडीसह हिवाळा आपणहून यायचा!

आता गाव बदलतंय. पूर्वी ज्या शेतात तांदूळ पिकायचा तिथेच आता सिमेंट काँक्रीट पीक आलयं. रस्ता रुंदीकरणात पिंपळच गेला आणि त्याच्या पारावरच्या गप्पा ही. पूर्वी एकमेकांच्या आजोबांपर्यंत सगळ्यांची नाव लोकांना ठाऊक असायची, आता माझ नाव तरी गावाला लक्षात असेल का हि शंका वाटते. नाही म्हंटल तरी बदलांनी लोकांसाठी अनेक सोयिंची क्रांती हि केली. संगणकाचा वेग, अवकाशातली झेप, मोबाईल क्षेत्रातली क्रांती थक्क करणारीच आहे. आता अगदी सातासमुद्रपार आप्तेष्टांशी गपा मारता येतात. संगणकांनी माहितीची कवाडं  तोडून फोडून सगळं सर्वांसाठी खुलं केलं. नाक्यावर नसली तरी whatsapp च्या '' कट्ट्यावर भरपूर गर्दी असते. सारे व्हर्चुअली जगाशी अगदी अप टू डेट असतात. त्या सिलिकॉन व्हॅलीत कुठला प्रोसेसर निपजतोय हे शेमड्या   पोरालाही ठाऊक असते. नाही, तंत्रज्ञानाशी जुळलेलं असलच पाहिजे पण तसच असण्याचा अट्टाहास खरंच किती ज्ञानवर्धक असतो? माहितीचा महापुराच हो तो, त्याला ज्ञानाच्या झऱ्याची सर कशी यायची? आपण झऱ्याचं पाणी पिऊ शकतो, पुराचं पाणी नक्की कसं पिणार आणि कोणतं?

हल्ली मुख्यतः प्राधान्यक्रमातच बदल झालेला वाटतो. मध्यंतरी मॉलमध्ये एका मुलाचा संवाद ऐकला. "मला हे पार्कर चं साधं ४०० रुपयाचं पेन नको, ते ८०० प्रीमियम एडिशन पाहिजे, परीक्षा आहे माझी!" काळ सोकावलाय दुसरं काय. हा बदल डिमांड ड्रिव्हन नसून मार्केट ड्रिव्हन आहे. पूर्वीच्या स्थैर्य आणि आनंदाची जागा पैसा आणि 'status' नि घेतल्याची भीती वाटते. 'बाबा' आमच्या पिढीतही काम करून दमायचे. पण आजोबा, काका, शेजारी अस एक सकस सपोर्ट स्ट्रक्चर असल्याने त्या दमण्याची कधी ' कहाणी' व्हायची नाही. आज घरात सगळेच जॉब करणारे आणि मुलं संस्कार वर्गात! आणि अनेकदा हे जॉब करणं घर चालवण्यासाठी नसून 'staus' मेंटेन करण्यासाठी! पूर्वी गावात दिवस दिवस वीज जायची पण तरीही गावात 'जाग' असायची. चोऱ्यामाऱ्या वगैरे अगदी क्वचितच. मध्यंतरी ग्रेट ब्लॅकआऊट मध्ये अमेरिकेसारख्या प्रगत (?) देशामध्ये अनेक चोऱ्या आणि लॉ आणि ऑर्डर चा प्रश्न निर्माण झाला म्हणतात! अशातही, गरीब राष्ट्राला अमेरिकेसारखे श्रीमंत व्हायचंय, त्यामध्ये मनाची, समाजाची, विचारांची श्रीमंती कितीही लोप पावली तरी पर्वा नाही. भारताचे लाडके राष्ट्राध्यक्ष, APJ, यांनी प्रगतीची फार सुंदर व्याख्या केल्येय. "देशाचा gdp कसा आहे, देशात गरीब श्रीमंत यातली दरी किती कमी झाली आहे आणि अग्रक्रमावर म्हणजे देशाची संस्कृती आणि समाजाची प्रकृती कशी आहे यावरून देश किती प्रगत हे ठरवावे!"


अशा या बदलांच्या वावटळीत कुठेतरी काहीतरी हरवून गेल्यासाखे वाटतं. ज्या बदलांनी दीर्घ काळ आनंद मिळतो ते स्वीकारावेत आणि नाही ती थेरं सरळ नाकारावीत! आमच्या  गावातल्या देवळात 'काल्याचे' कीर्तन असायचे. कीर्तनापेक्षा अर्थातच लक्ष नंतरच्या प्रसादावर असायचं. पण त्यातच कधीतरी कानांनी टिपून ठेवलेली ओळ, "जे जे होते ते ते पाहावे, मुखी असू द्यावे समाधान". हल्ली कीर्तनं कधीच बंद झाली, बुवाहि गेलेमंदिराचं आता 'देवस्थान' झालयं आणि देवही खचितच भाव खायला लागून भक्तांना ठरलेल्या वेळीच भेटायला लागलाय. तसं त्याचं e-दर्शन २४ तास उपलब्ध असतं म्हणा. पण त्या जीर्ण देवळात एकाच उदबत्तीचा येणारा कुबट पण सात्विक सुवास आता विरलाय. आणि या बदलांच्या 'काल्यात' मी तिथल्याच कोपऱ्यात समाधानावर अजूनही डोळे लावून वाट पाहात बसलोय. पण कीर्तन संपल्याशिवाय समाधानाचा प्रसाद मिळणे नाही. कालाय तस्मै नमः...